डिप्रेशन मध्ये जात आहेत डॉक्टर, कोरोनाचा होत आहे दुष्परिणाम

डिप्रेशन मध्ये जात आहेत डॉक्टर, कोरोनाचा होत आहे दुष्परिणाम

कोरोनाच्या भीषण महामारीने सगळीकडे थैमान मांडले आहे. आपले कोरोना योद्धे, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी काम करत आहेत. आपण बातम्या बघतो, रुग्णांचे फोटोज बघतो तरीही आपल्याला काही काळ काहीच सुचत नाही. मात्र, जे हे सर्व आपल्या डोळ्यांसमोर घडताना बघतात त्यांचे काय होत असेल ?

होय, आपल्या कोरोना योद्धे, म्हणजेच आपले डॉक्टर अहोरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या समोर रुग्णांची अवस्था, रुग्णांचा होत असलेला मृत्यू ह्यामुळे त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल ह्याबद्दल आपण थोडक्यात विसरुनच गेलो. त्यांनादेखील हृदय आहेच ना, ह्या सर्व घटनांचा त्यांच्यावर देखील परिणाम होतोच, सध्याच्या ह्या परिस्थितीमुळे डॉक्टरांच्या मानसिक स्वास्थ्यावर चांगलाच परिणाम होत असल्याचे पुढ्यात येत आहे.

पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसन्न फुटाणे सांगतात, “मी जेव्हा सकाळी येतो तेव्हाच संपूर्ण लॉबी रूग्णांनी भरलेली असते. अनेकजण कोव्हिड पॉझिटिव्ह असतात. कोणी बेड देण्यासाठी विनवण्या करत असतं, कोणी रडत तर , कोणी ओडरत असतं. पण रूग्णांनी भरलेल्या वॉर्डमुळे अनेकांना हॉस्पिटलमध्ये सर्वच रुग्णांना बेड देता येत नाही. त्यांना बाहेरच औषधं देऊन घरी विलगीकरणात राहायला सांगावं लागतं.


“त्यात अनेक जण रडून सांगतात की, ‘आमच्या घरी जागा नाही, त्यामुळे आमच्या रूग्णाला इथेच ऍडमिट करून घ्या’. रूग्णांच्या नातेवाईकांना कसं आणि किती समजवायचं ? त्यांचं रडणं, ओडरणं, विनवण्या करूनही काहीच करता येत नाही त्यामुळे अपराधीपणाची भावना मनात घर करून राहते. हा फक्त एकाच दिवसाचा अनुभव नाही. तर मागचं वर्षभर आम्ही रोज हे सहन करतोय. जर माझ्याकडे बेड उपलब्‍ध असेल तर मी का तुम्हाला देणार नाही ? मी तुमचा शत्रू नाही. हे रूग्णांच्या नातेवाईकांना कसं समजवणार?”

ससून हॉस्पिटलमध्येच काम करणारे निवासी डॉक्टर प्रशांत मुंडे बोलतात, “रूग्णांचे नातेवाईक आमच्यावर ओरडतात. तुमच्याकडे द्यायला बेड नाहीत ? ऑक्सिजन नाहीत ? इंजेक्शन नाहीत, मग तुम्ही नक्की काय करताय? सरकारवर असणारा राग ते आमच्यावर निघतो. पण आम्हाला काहीच बोलता येत नाही. यातून आम्हाला खूप नैराश्य येतं.”

” कस्तुरबा रुग्णालयातच काम करत असणाऱ्या एका परिचारिकेच्या पतीला कोरोनाची लागण झाली. ते कस्तुरबा रुग्णालयातच दाखल झाले. त्यांच्याशी मी रोज बोलायचो आणि काऊन्सिलींग करायचो. तुम्ही बरे होणार असा विश्वास द्यायचो. मात्र, एक दिवस ते व्हेंटिलेटरवर गेले.सर प्लीज काहीतरी करा ना असे, आमची परिचारिका रोज मला म्हणायची. २७ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून देखील त्यांचा मृत्यू झाला. ती परिचारिका त्यावेळी गरोदर होती. तिच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर मी सुन्न झालो.


“त्या परिचारिकेचा चेहरा बघून ती घटना आठवत राहते. वारंवार एकच प्रश्न मनात येत राहतो, आपण काहीच का नाही करू शकलो ? तू पूर्वीसारखा बोलत नाहीस, हसत नाहीस, इतक्या टेन्शनमध्ये का असतोस,असे मला माझे घरचे म्हणतात. पण काहीही केलं तरी मागच्या दीड वर्षांपासून रूग्णांचे सुरू असलेले हाल, अपुऱ्या सुविधांमुळे झालेले मृत्यू आणि ते मागे टाकून नवीन रूग्णांना वाचवण्याची धडपड संपत नाहीये. रूग्णांची हे हाल सतत डोळ्यासमोर असतात. आपल्या कुटुंबावर ही परिस्थिती आली तर? ही भिती मनातून जात नाही. यातून नैराश्य आल्यासारखं वाटतं.” मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयातील डॉ. साहिल मोरिवाला ह्यांना आपला अनुभव सांगता असताना अश्रू अनावर झाले. अगदी पहिल्या रुग्णापासून ते आजतागायत डॉ साहिल रुग्णांची सेवा करत आहेत.

माझ्या वॉर्डमध्ये येणाऱ्या २०० ते २५० रुग्णांपैकी ५-१० रूग्णांची स्थिती गंभीर असते. ज्यांना अतिदक्षता विभागात हलवण्याची व्हेंटिलेटर लावण्याची गरज असते. पण अतिदक्षता विभागात जागा नसल्यामुळे त्यांना फक्त ऑक्सिजनवर ठेवावं लागतं. अपुऱ्या सुविधांमुळे आपल्याला त्यांच्या तब्येतीची सगळी परिस्थिती माहिती असूनही काहीच करता येत नाही. अनेक रूग्णांचे यामुळे डोळ्यासमोर जीव गेले आहेत. त्यावेळी आम्ही हतबल असतो,”

संपूर्ण देश कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत सध्या होरपळून निघाला आहे. या लाटेच्या केंद्रस्थानी असलेल्या डॉक्टरांची अवस्थाही बिकट झाली आहे.
पहिल्या लाटेला कसंबसं परतवून लावताना तोच दुसरी लाट अधिक तीव्रतेने आदळली आहे. त्यामुळे डॉक्टर शरीराने तर थकलेच आहेत. पण मनोधैर्य टिकवून ठेवणं हेही त्यांच्यासमोरचं एक मोठं आव्हान ठरतं आहे.

डोंबिवलीमधल्या काही हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून काम करणारे भरत जैन त्यांचा अनुभव सांगतात, “३४ वर्षांची गरोदर महिला व्हेंटिलेटरवर गेली. त्यावेळी त्या हॉस्पिटलमधला ऑक्सिजन संपत आला होता. उद्या काय होणार असाच विचार करत येणारा दिवस संपतो. तरूण रूग्णांचे देखील मृत्यू होत आहेत. पण याउलट ज्यांना कोव्हिड झालेला नाही तर, इतर आजारांसाठी त्यांना उपचाराची गरज आहे त्यांनासुद्धा उपचार मिळत नाहीत. हृदयविकार, स्ट्रोक अशा आजारांच्या रूग्णांना औषधं देऊन घरी पाठवावं लागत आहे. आम्ही रोज ज्या टेन्शनमधून जातो ते टेन्शन घरी आपोआपच येतं. त्यामुळे कुटुंबावर त्याचा परिणाम होतो आहे”.

ह्या भीषण परिस्थिमध्ये, आपण आपल्या डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवायचे कार्य करायला हवे. त्यांची व्यथा समजून घेऊन, ते कामावर असताना शक्य असल्यास त्यांच्या कुटुंबाचे होईल तसे सहकार्य करायला हवे. त्यामुळे, त्यांच्या मनात आपल्या कुटुंबासाठी असणारी भीती तरी कमी होऊ शकते. आपल्या नातेवाईकांना, अप्तेईष्टाना डॉक्टरांना सहकार्य करण्याचे आवाहन करत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम देखील आपण करु शकतो. ज्याप्रकारे, परिस्थिती आपल्यासाठी गंभीर आहे त्याचप्रकारे ती, कोरोना योद्धे आणि त्यांच्या कुटुंबासाठी अजूनच गंभीर आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *